पडद्याआडून: ‘एकदा पाहावं करून’; विनोदाच्या आड दडलेला वास्तवाचा आरसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ekda pahava karun marathi natak review: vaibhav mangle and anand ingale shine in ratnakar matkari’s classic comedy

>> पराग खोत

रत्नाकर मतकरी हे मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेले नाटककार आहेत. त्यांची अनेक कौटुंबिक, सामाजिक आणि वैचारिक नाटकं रंगभूमीने पाहिली आहेत. त्या नाटकांना रिपीट व्हॅल्यू आहे आणि म्हणूनच त्यांच्या नाटकांचे वेगवेगळय़ा काळात पुनरुज्जीवन होत असते. सांप्रत मतकरींच्या ‘एकदा पाहावं करून’ या हलक्याफुलक्या विनोदी नाटकाचे पुनरागमन झालेय. योगायोगाने 28 वर्षांपूर्वी दिग्दर्शक विजय केंकरे यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन केले होते.

नाटकाची कथा दोन मध्यमवयीन पुरुषांभोवती फिरते. एक म्हणजे बेधडक, बिनधास्त स्वभावाचा, गडगंज काळा पैसा अससेला कानडी बाप्पाजी धरसोड; तर दुसरा आहे पांढरपेशा मराठी बबनराव बाक्रे, वकील असूनही स्वभावाने भित्रा पण स्वतःला नैतिक मूल्यांचा स्वयंघोषित रक्षक समजणारा. या दोघांची पूर्णपणे विरुद्ध असलेली जगं एकमेकांवर आदळतात तेव्हा गोंधळाची आणि विनोदाची मालिकाच सुरू होते. बबनराव बाक्रेंची मुलगी सायली आणि बाप्पाजी धरसोडचा मुलगा बकुळ एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांशी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतात. या प्रेमकथेभोवती घडणाऱया प्रसंगांतून हास्याचे फवारे उडतात. अनपेक्षित भेटीगाठी आणि गमतीदार प्रसंगांची रेलचेल सुरू होते. यात बाबीताई बाक्रे आणि भामाबाई धरसोड या त्यांच्या सौभाग्यवतीही सामील होतात. मात्र हसत-खेळत पुढे सरकणारी ही कथा वास्तवाचा आरसा आपल्यासमोर धरते. ‘जे गमावण्याची कधी संधी मिळाली नाही म्हणून टिकून राहतं ते चारित्र्य’ हे बाप्पाजीच्या तोंडचं वाक्य म्हणजे नाटकाची पंचलाइन आहे.

दोन घटका निखळ करमणूक हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून या नाटकाची मांडणी करण्यात आलीय. जास्त विचार न करता, तर्क न लावता नाटकाचा आनंद घेता येत असेल तर तुमच्यासाठी हे नाटक विरंगुळा ठरेल. या नाटकात पात्रांची आणि प्रसंगाची रेलचेल आहे. यात शाब्दिक, शारीरिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाची पखरण आहे. क्वचित फार्सच्या अंगाने जाणारं हे एक कौटुंबिक विनोदी नाटक आहे. नाटक आणि नाटकातील काळ जुना असल्याने काही ठिकाणी तो फील येतो तर काही ठिकाणी नव्याजुन्याची सरमिसळ जाणवते. मुख्य पात्रांच्या जोडीला बाक्रेंचा सहकारी प्रसन्नकुमार सरवटे, धरसोडांचा हरकाम्या नोकर मल्हारराव आणि बाप्पाजींचं प्रेमपात्र असलेली मंदाकिनी आणि तिच्या शोधात आलेला तिचा नवरा अशी इतरही पात्रे भर घालतात. ‘लाली इंदुरीकर’ ही व्यक्तिरेखा म्हणजे या नाटकाचं सरप्राईज पॅकेज आहे. तिच्या येण्यामुळे पात्रांच्या परस्परसंबंधातील समीकरणं बदलतात आणि हशा-टाळय़ांची भर पडते.

वैभव मांगले आणि आनंद इंगळे हे या नाटकाचे दोन भक्कम आधारस्तंभ आहेत. दोघांनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली आहे. मांगलेंचा बाप्पाजी रांगडा आणि बिनधास्त असला तरी इंगळेनी भित्र्या बबनरावांच्या पात्रात जान आणली आहे. त्यांनी न बोलता दिलेल्या रिऍक्शन्स निव्वळ अफलातून. तसंच लालीच्या आगमनानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल त्यांनी मस्त साकारलाय. इतर सर्वच पात्रांनी त्यांना योग्य ती साथ दिलीय. आपल्याला नेमकं काय दाखवायचं आहे हे दिग्दर्शकाच्या मनात पक्कं असल्याने त्यानुसार नाटकाची बांधणी केली आहे. विजय केंकरे हे सध्याचे सर्वात व्यग्र दिग्दर्शक आहेत आणि त्यांचे हे हातखंडा नाटक आहे.

सुधीर जोशी, मोहन जोशी, मंगेश कदम, संजय मोने, सुनील तावडे, प्रसाद ओक, शीतल शुक्ल, अमिता खोपकर, मंदा देसाई आणि चिन्मयी सुर्वे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी गाजवलेले हे नाटक नव्या नटसंचातही तितकेच देखणे झाले आहे. डोक्याला त्रास न देता, तीन तास निखळ करमणूक हवी असेल तर हे तीन अंकी नाटक एक चांगला पर्याय ठरू शकेल.

लेखक: रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक: विजय केंकरे
कलाकार: भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, गौरी फणसे, नेहा कुलकर्णी, नामांतर कांबळे, कृष्णा चतुर्भुज, धनश्री दळवी, भूषण पाटील, वैभव मांगले आणि आनंद इंगळे
नेपथ्य: राजन भिसे
प्रकाश: शीतल तळपदे
संगीत: अजित परब
वेशभूषाकार: मंगल केंकरे
निर्माते: श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे, अजय विचारे

ekda pahava karun marathi natak review: vaibhav mangle and anand ingale shine in ratnakar matkari’s classic comedy.

read the latest review of ratnakar matkari’s marathi play ‘ekda pahava karun’ directed by vijay kenkre. featuring powerhouse performances by vaibhav mangle and anand ingale, this family comedy is a perfect blend of wit and reality.