
आसनगाव स्थानकातील प्रवाशांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेला मदत कक्ष सध्या शोपीस बनला आहे. मोठा गाजावाजा करत महिनाभरात दोन वेळा उद्घाटन करण्यात आले. हा मदत कक्ष प्रवाशांच्या तक्रारी, मार्गदर्शन व आपत्कालीन मदतीसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र या मदत कक्षात एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चाकरमानी प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह प्रवाशांच्या तक्रारी, मार्गदर्शन व आपत्कालीन मदतीसाठी उपयुक्त ठरेल या दृष्टीने आसनगाव स्थानकात मदत कक्ष उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन दोन वेळा करण्यात आले तरीदेखील मदत कक्षात मदतीसाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जर या मदत कक्षासाठी कर्मचारीच देणार नसतील तर मग दोनदा उद्घाटन करण्याचा खटाटोप कशासाठी? तसेच मदतीसाठी कुणीही नसेल तर हा रिकामा कक्ष उगीच जागा अडवून ठेवण्याचा अट्टहास का, असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
तत्काळ कर्मचारी उपलब्ध करावा
कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या मदत कक्षासाठी तत्काळ कर्मचारी उपलब्ध करून प्रत्यक्ष कार्यान्वित करावा, अन्यथा कक्षच काढून टाकून प्रवाशांसाठी मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी केले आहे.
































































