
मेंटेनन्स देण्यावरून हाणामारी आणि कोयत्याने वार केल्याची घटना तळोजा येथील एम. एम. अॅव्हेन्यू गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे. यात सोनवणे कुटुंबाने नाविक पिता-पुत्रावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दिनेश नाविक आणि देवा नाविक हे जखमी झाले असून त्यांच्याबर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळोजा येथील कोयनावळे, घोट कॅम्प परिसरातील एम. एम. अॅव्हेन्यु या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. या इमारतीत सध्या १६ कुटुंबे राहतात. सोसायटीचा कारभार दिनेश नाविक हे पाहतात. डिसेंबरपर्यंत ५०० रुपये इतका मेंटेनन्स काढण्यात येत होता. मात्र जानेवारीपासून तो ६५० रुपये ठरवण्यात आला. विश्वास सोनवणे आणि त्यांचे कुटुंबीय जुन्या दराने मेंटेनन्स देण्यावर ठाम होते. त्यावर आशुतोष सोनवणे याने दिनेश नाविक यांना मेंटेनन्स देण्याच्या बहाण्याने खाली बोलावले. यावेळी बाचाबाची झाली. विश्वास सोनवणे यांची ऋषिकेश आणि अशुतोष ही दोन मुले हातात कोयता घेऊन आले आणि त्यांनी दिनेश नाविक यांच्या डोळ्यावर वार केला. वडिलांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा देवा गेला असता त्याच्यावरही वार केले.
डिझेल चोरी करणारे दोघे ताब्यात
पनवेल – ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोदकुमार सिंग, अजय खंदारे अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अॅमेटी युनिव्हर्सिटी येथील दूक पार्किंगमध्ये ट्रक उभा असताना चोरट्यांनी १५० लिटर डिझेलची चोरी केली होती.




























































