
वरळीतील ऍनी बेझंट मार्ग आणि सेनापती बापट मार्ग येथे महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळाकडून (एमएसआरडीसी) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तत्काळ नॉईस बॅरिअर बसविण्यात यावे, अशी मागणी युवासेनेच्यावतीने एमएसआरडीसीकडे करण्यात आली आहे.
सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावर टेम्पोची धडक बसल्यामुळे वरळी पोलीस वसाहतीतील अंकीत सुर्वे हा पोलीस कर्मचारी उड्डाणपुलावरून खाली पडला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा या उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी नुकतीच या दोन्ही उड्डाणपुलावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नॉईस बॅरिअर बसवण्याची मागणी एमएसआरडीसीकडे केली आहे.




























































