
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार करारानंतर रशियाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे मान्य केले आहे. मात्र, रशियाने स्पष्ट केले आहे की, ‘हिंदुस्थान कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे आणि दिल्लीला तेल पुरवणारा रशिया हा एकमेव देश नाही’.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, ‘रशिया हा हिंदुस्थानचा एकमेव तेल पुरवठादार नाही, याची आम्हाला आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा तज्ज्ञांना पूर्ण कल्पना आहे. हिंदुस्थान नेहमीच इतर देशांकडूनही तेल खरेदी करत आला आहे, त्यामुळे यात काहीही नवीन नाही’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेकडून किंवा व्हेनेझुएला कडून तेल घेण्याचे मान्य केल्याच्या दाव्यावर पेस्कोव्ह बोलत होते.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनीही यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘रशियाकडून हायड्रोकार्बन खरेदी करणे दोन्ही देशांच्या फायद्याचे आहे आणि यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता राहते. आम्ही हिंदुस्थानसोबतचे हे सहकार्य सुरू ठेवण्यास तयार आहोत.’
सध्या हिंदुस्थान रशियाकडून दिवसाला सुमारे १५ लाख बॅरल क्रूड ऑईलची आयात करत आहे, जे हिंदुस्थानच्या एकूण गरजेच्या एक तृतीयांश आहे.
तज्ज्ञांच्या मत काय?
तज्ज्ञांच्या मते, हिंदुस्थान पूर्णपणे रशियन तेल बंद करू शकत नाही. अमेरिकेचे तेल ‘लाईट’ (हलके) असते, तर रशियाचे तेल ‘हेवी’ (जड) आणि सल्फरयुक्त असते. हिंदुस्थानी रिफायनरींना हेवी तेलाची गरज असते. अमेरिकेच्या तेलाचा वापर करण्यासाठी हिंदुस्थानला अतिरिक्त खर्च करून ते इतर तेलासोबत मिसळावे लागेल, जे आर्थिकदृष्ट्या सोपे नाही.
russia on india us oil deal: new delhi is free to choose oil suppliers says kremlin
russia reacts to donald trump’s claim that india will stop buying russian oil. kremlin says india is free to buy crude from any country and highlights energy cooperation.

























































