
क्रमांक डायल केल्यास त्वरित रुग्णवाहिकेने घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित असते. पण ही रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळे चक्कर येऊन खाली कोसळलेल्या तरुणीची फरफट झाल्याची घटना मंगळवारी कसारा स्थानकाजवळ घडली. वारंवार फोन करूनही अॅम्ब्युलन्स आली नाही. अखेर या तरुणीला खासगी वाहनातून शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.
कसारा स्थानकात एका तरुणीला चक्कर येऊन ती खाली कोसळली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. ही घटना समजताच ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन तरुणीला गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तिची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. उपजिल्हा रुग्णालयात तरुणीला घेऊन जाण्यासाठी स्थानिक व्यापारी ऋषभ अग्रवाल यांनी हेल्पलाइनवर फोन केला. चारवेळा नंबर डायल करूनही फोन उचलला नाही. अखेर तातडीची गरज लक्षात घेऊन अग्रवाल यांनी खासगी गाडीची व्यवस्था करून त्यातून त्या अत्यवस्थ तरुणीला शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.






























































