सत्य लोकांसमोर येणे गरजेचे, 9 तारखेनंतर सर्व विषयांवर आणि विमानातील नेमक्या घटनेवर बोलणार, रोहित पवार यांचे सूचक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या दु:खद परिस्थितीत संपूर्ण पवार कुटुंब एकवटले असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामती येथे आज झालेल्या विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या 9 तारखेनंतर सर्व विषयांवर आणि विमानातील नेमक्या घटनेवर आम्ही स्पष्टपणे बोलू, असे सूचक विधान रोहित पवार यांनी केले आहे.

पवार कुटुंबात ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच केंद्रबिंदू राहिले असून या कठीण काळातही त्यांनी संपूर्ण कुटुंबाला आधार देत धीर देण्याचे काम केले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील शरद पवारांचे कार्य मोठे आहेच, पण कौटुंबिक संकटाच्या वेळी ते नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. आजच्या बैठकीत अजित पवार यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून कुटुंबातील सदस्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी देखील केली आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे असल्याने त्यांच्या नावाचे एक भव्य स्मारक आणि म्युझिअम उभारण्याची इच्छा कुटुंबियांसह सर्वसामान्यांची आहे. हे स्मारक बारामतीत असावे की अन्यत्र, याबाबत बैठकीत विचारविनिमय झाला. पार्थ पवार, जय पवार, काकी सुनेत्रा पवार आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे मत आहे की, हे स्मारक अशा ठिकाणी असावे जिथे लोकांना सहज येता येईल आणि अजित पवारांच्या कार्याची माहिती मिळेल. त्यांच्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासाचा वारसा या स्मारकाच्या माध्यमातून जपला जाणार आहे. या स्मारकाबाबतची अधिकृत घोषणा संबंधित सामाजिक संस्था आणि ट्रस्टच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत केली जाईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या कुटुंब एका मोठ्या दु:खातून सावरत आहे. त्यामुळे अशा काळात राजकीय चर्चा करणे किंवा भूमिका घेणे भावनिकदृष्ट्या कठीण आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि चर्चा भलतीकडेच भरकटत चालल्या आहेत, याचे दुःख वाटते. दादांच्या मनात नेमके काय होते आणि त्यांची काय इच्छा होती, यावर चर्चा होण्याऐवजी राजकारण केले जात आहे. तसेच विलीनीकरण किंवा युती यांसारख्या मोठ्या विषयांवर बोलण्याइतपत मी मोठा नाही. मात्र, येत्या 9 तारखेनंतर या सर्व विषयांवर आणि विमानातील नेमक्या घटनेवर आम्ही स्पष्टपणे बोलू. काही अनुत्तरीत प्रश्नांची माहिती सध्या गोळा केली जात असून सत्य लोकांसमोर येणे गरजेचे आहे, असे रोहित पवार म्हणाले.

पवार कुटुंबातील राजकीय दुराव्याबाबत विचारले असता, रोहित पवार यांनी कबुली दिली की पक्ष वेगळा झाला तेव्हा काही प्रमाणात दुरावा जाणवला होता. मात्र, त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि स्वतः अजित पवार यांच्याकडून कौटुंबिक स्तरावर एकत्र येण्याचे प्रयत्न नेहमीच झाले. राजकारण एका बाजूला असले तरी कुटुंबाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र राहण्याला प्राधान्य दिले होते, असे रोहित पवार यांनी सांगितले.