
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वर्षी जत्रोत्सव सोमवार, दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. या दिवशी पहाटे 3 वा. पासून एकूण 10 दर्शन रांगांद्वारे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी कंबर कसली आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून विविध व्यावसायिकांची आंगणेवाडीमध्ये लगबग वाढली आहे.
यात्राकाळात सामाजिक संस्था व विविध पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिर व परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात हे लक्षात घेऊन सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांगांसाठी मजबूत पूल आणि इतर व्यवस्था कामे अंतिम टप्यात आहेत.
‘व्हीआयपी मार्ग’ असलेल्या मसुरे-आंगणेवाडी मार्गावरील दत्तघाटीमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. देवालयालगतचे सुसज्ज विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच परिसरातील अंडरग्राऊंड विद्युत वाहिन्या यामुळे वीज व्यवस्थाही सुरक्षित झाली आहे. आंगणेवाडी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते प्राधान्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. जत्रेदिवशी मसुरे देऊळवाडा दत्तघाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जादा वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात करण्याची मागणी होत आहे.
मंदिर परिसरातील पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करण्यात आली असून काही ठिकाणी नवीन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. यात्रा कालावधीत दिव्यांग भाविकांना कणकवली आणि मालवण स्टॅण्डकडून थेट मंदिरापर्यंत रिक्षाद्वारे नेण्याची सोय करण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी स्पष्ट केले.
या वर्षी दोन दिवस जत्रोत्सव
श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सवात दुसऱया दिवशीही आंगणेवाडीत येणाऱया भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने घेता येणार आहे. श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगांचा उपयोग करावा, असे आवाहन आंगणे कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
‘प्लॅस्टिकमुक्त’ यात्रेसाठी आवाहन
अंगणेवाडी यात्रा प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि प्रशासनाने युद्धपातळीवर कंबर कसली असून त्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना ओटीसमान विक्रेत्यांना कापडी पिशव्या पुरवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या 4 ज्यादा गाडय़ा
जत्रेसाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान 4 विशेष गाडय़ा चालवणार आहे. ट्रेन क्रमांक 01003 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 8 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.55 वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री 12 वाजता मडगावला पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 01004 विशेष ट्रेन 7 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी रोजी मडगावहून सायंकाळी 4.30 वाजता निघेल आणि दुसऱया दिवशी सकाळी 5 वाजून 50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल, असे मध्य रेल्वेने गुरुवारी जाहीर केले.




























































