
क्रिकेटच्या इतिहासात आज पुन्हा एक सुवर्णाक्षर आणि सुवर्णक्षण कोरण्याची वेळ आली आहे. 19 वर्षांखालील अर्थातच युवा वर्ल्ड कपचा इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना आणि समोर आहे एकच लक्ष्य, हिंदुस्थान जगज्जेतेपदाचा षटकार ठोकणार. 140 कोटी हिंदुस्थानी नागरिकांनाही या जेतेपदाची उत्सुकता लागलीय. त्यामुळे झंझावाती फलंदाजांच्या खेळाने हिंदुस्थानचे युवा हा महाविक्रम रचतील, असा दृढविश्वास सर्वांच्या मनात आहे.
या स्पर्धेतील दोन अपराजित संघ म्हणजे हिंदुस्थान आणि इंग्लंड. दोन्ही संघ एकही सामना हरलेले नाहीत. हेच अपराजित संघ हरारेच्या स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर एकमेकांना हरवण्यासाठी आमनेसामने येत आहेत. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी युवा संघ सहावे जगज्जेतेपद पटकावण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे थॉमस रेचा इंग्लंड संघही आव्हान देण्यासाठी सज्ज आहे; पण आजचा रंग, सूर आणि आत्मविश्वास, सगळंच निळ्या जर्सीतल्या हिंदुस्थानकडे झुकलेलं दिसतंय.
या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने फलंदाजीतील ताकद आणि गोलंदाजीतील शिस्त यांचा सुरेख संगम घडवत प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलेय. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध 311 धावांचा विक्रमी पाठलाग करताना एरॉन जॉर्जने झळकावलेलं शतक म्हणजे जणू या संघाच्या आत्मविश्वासावरची मोहोरच!
इंग्लंडनेही ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत रोखत 27 धावांचा विजय मिळवला; मात्र अंतिम सामन्यात केवळ डावपेच नव्हे, तर धाडस, संयम आणि क्षण ओळखून फटका मारण्याची वृत्ती लागते आणि ती वृत्ती आज हिंदुस्थानकडे जास्त दिसतेय.
संभाव्य उभय संघ
हिंदुस्थान: एरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान पुंडू (यष्टीरक्षक), आर.एस. अंब्रिश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
इंग्लंड: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयस, थॉमस रे (कर्णधार/यष्टीरक्षक), कालेब फाल्कनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लम्सडन, अॅलेक्स फ्रेंच.
लक्षवेधी लढती
वैभव सूर्यवंशी विरुद्ध मॅनी लम्सडन: हिंदुस्थानचा विस्पह्टक सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मॅनी लम्सडन यांच्यातील संघर्ष सामन्याची दिशा ठरवू शकतो. सहा सामन्यांत 264 धावा करणारा सूर्यवंशी जर रंगात आला, तर षटकारांचा पाऊस अटळ!
विहान मल्होत्रा विरुद्ध फरहान अहमद: मधल्या षटकांत फरहान अहमदची फिरकी आणि विहान मल्होत्राची संयमी फलंदाजी यांच्यातील शह-काटशह पाहायला मिळणार आहे.
बेन मेयस विरुद्ध हेनिल पटेल: 399 धावा करणारा बेन मेयस आणि नव्या चेंडूने भेदक मारा करणारा हेनिल पटेल – हा संघर्षही निर्णायक ठरण्याची शक्यता.
हिंदुस्थानची ताकद
वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा उत्तम समतोल, दोन यष्टीरक्षकांमुळे मिळणारी लवचिकता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिंकण्याची सवय. मोहम्मद एनान, उधव मोहन यांच्यामुळे गोलंदाजीत वैविध्य आहे, तर फलंदाजीत प्रत्येक क्रमांकावर आत्मविश्वास.
u-19 world cup final: india eyes historic 6th title against england in harare
ayush mhatre-led india faces thomas ray’s england in the u-19 world cup final at harare. will india hit a ‘sixer’ of world titles? check playing xi and key battles.



























































