
पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील मेल-एक्सप्रेसचा खोळंबा होत आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी 4 तास उशिराने सुटली. त्यामुळे गावी जाण्यासाठी पहाटेच घरातून बाहेर पडून रेल्वे स्थानक गाठलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 15 फेब्रुवारीपर्यंत गाडीचे वेळापत्रक विस्कळीत राहण्याची चिन्हे आहेत.
पनवेल आणि कळंबोली स्थानकांदरम्यान गर्डरच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला आहे. तुतारी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या प्रमुख गाडय़ांच्या वेळापत्रकाला ब्लॉकचा फटका बसला आहे. यात सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी कोकणच्या दिशेने सर्वप्रथम रवाना होणाऱया मांडवी एक्सप्रेसच्या वेळेवर मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी 4 तास 5 मिनिटे उशिराने म्हणजेच 11 वाजून 15 मिनिटांनी ही गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. त्यापाठोपाठ गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी एक्सप्रेसला 3 तास 55 मिनिटांचा विलंब झाला. सध्या आंगणेवाडी जत्रेसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मोठय़ा प्रमाणावर मुंबईकर-ठाणेकर आंगणेवाडीच्या जत्रेसाठी गावी जात आहेत. त्या प्रवाशांची बुधवारी आणि गुरुवारी चार तास रखडपट्टी झाली.


























































