
>> मेधा पालकर
चोखंदळ कथा-कादंबऱयांसोबत मनोरंजनातून ज्ञानाचा समतोल साधणारे, अतिशय सोप्या भाषेत वाचकांना विज्ञानाचे दालन खुले करून देणारे, चिकित्सा करणारी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित करणारे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आत्मकथनाची पुस्तक मालिका प्रकाशित करणारे प्रकाशक अशी ‘मनोविकास प्रकाशन’चे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांची ख्याती होती. तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या अरविंद पाटकर यांनी गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली होती.
दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या टप्प्यावर अभिनव प्रकाशनचे वा. वि. भट यांनी पाटकर यांना मोलाची मदत केली. पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकर यांना आधीपासूनच होता. त्याच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली.पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा वाचकांशी थेट संवाद वाढत गेला.
मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाऊस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले. अखेर 4 एप्रिल 1984 रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकासचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. भट यांच्या पाठिंब्याने ‘शाहीर’ हे मनोविकास प्रकाशनचे पहिले पुस्तक 1985 मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक पुस्तकांच्या माध्यमातून मनोविकासने स्वतंत्र ओळख निर्माण केली.
2005 पासून अरविंद पाटकर पुण्यात स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांनी प्रकाशन कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेले. प्रकाशन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा राज्य सरकारने श्री. पु. भागवत पुरस्काराने गौरव केला होता. ‘मनोविकास प्रकाशन’ हे नावही एका सहजसुंदर क्षणातून साकार झाले. कोकणातील कुडाळ येथे पुस्तक प्रदर्शनासाठी गेले असताना शेजारी राहणाऱ्या बबन पाटकर यांनी ‘विकास बुक सेंटर’ हे नाव सर्वसामान्य वाटते असे सांगत त्यामागे ‘मनो’ जोडण्याची सूचना केली. त्यातूनच ‘मनोविकास प्रकाशन’ या नावाचा जन्म झाला.अरविंद पाटकर यांची पुण्यात झालेल्या 2020 मध्ये झालेल्या ’वाचन जागर महोत्सवा’च्या निमित्ताने ’साधना’ने मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी आपली पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विषद केली होती.
पाटकर म्हणाले होते की, मी मनोविकास सुरू केले तेव्हा मुळातच माझी चळवळीची पार्श्वभूमी होती. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी भारतीय कम्युनिस्ट पक्षात काम करायचो. त्यामुळे विचारांची बांधिलकी पहिल्यापासूनच होती. प्रकाशन व्यवसाय सुरू करताना कोणत्याही परिस्थितीत जातीयवाद, अंधश्रद्धा निर्माण करणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी पुस्तके प्रकाशित करायची नाहीत, समाजाचे एक पाऊल मागे पडेल अशी पुस्तके छापायची नाहीत हे ठरलेले होते. अरविंद पाटकर म्हणायचे, मनोविकासची सुरुवातच लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठेंच्या लावणी, गाणी, पोवाडे एकत्र असलेल्या ‘शाहीर’ पुस्तकाने झाली. त्यानंतर आम्ही प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलनावरची पुस्तके प्रकाशित केली. विज्ञान, मानसशास्त्र, आरोग्य या विषयांवर भर दिला.
लहान मुलांसाठी पुस्तपं प्रकाशित केली. पुस्तकांमध्ये निरनिराळे विषय आले तरी आमची भूमिका तीच राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तके प्रकाशित केली. आंबेडकरी साहित्य प्रकाशित केलं. आपल्याकडून प्रकाशित केली जाणारी जास्तीत जास्त पुस्तके पुरोगामी चळवळीला पूरकच असली पाहिजेत हे माझे पहिल्यापासूनचे तत्त्व होते. माझा मुलगाही ते आज पाळतो आहे. मनोविकास प्रकाशनाने अनेक पुस्तक प्रकल्प राबवले. नंदा खरे यांच्या ‘कहाणी मानवप्राण्याची’, संदेश भंडारे यांचं ‘वारी एक आनंदयात्रा’, चंद्रमोहन कुलकर्णी यांचं ‘कॉल ऑफ द सीज’, महावीर जोंधळे यांचे ‘किरण पाणी’ आणि मुपुंद संगोराम यांनी लिहिलेलं भीमसेन जोशी यांच्यावरील ‘ख्यालिया’, अशी अनेक वेगळी पुस्तके प्रकाशित केली. पाटकर यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला होता. दोन वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेने रा.ज. देशमुख स्मृती पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.



























































