रेल कामगार सेनेच्या तत्परतेमुळे वाचले रेल्वे कर्मचाऱ्याचे प्राण, उपचारातील मदतीबरोबरच कुटुंबीयांना दिला खंबीर आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सक्रीय असणाऱया रेल कामगार सेनेच्या माणुसकीची प्रचीती पुन्हा एकदा आली. माझगाव यार्ड येथे प्रजासत्ताक दिनी सायंकाळी झेंडा उतरवताना ओव्हरहेड वायरशी संपर्कात आल्यामुळे रेल्वे कर्मचारी सत्येंद्र देवरुखकर यांना विजेचा जोरदार झटका लागला. त्यात गंभीर जखमी झालेल्या देवरुखकर यांना रेल कामगार सेनेच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले.

विजेचा झटका लागल्याने सत्येंद्र देवरुखकर जवळपास 50 टक्के भाजले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. रेल कामगार सेनेने घटनेनंतर तातडीने देवरुखकर यांना रेल्वे रुग्णालयात दाखल केले. नंतर भाजलेल्या रुग्णांसाठी विशेष उपचार उपलब्ध असलेल्या मसीना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशावरून कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना उपनेते व रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने देवरुखकर यांची रुग्णालयात भेट घेतली आणि उपचाराचा आढावा घेतला. शिष्टमंडळात मंडळ अध्यक्ष चंद्रकांत विनरकर, प्रशांत कमानकर, योगेश भोईर, नीलेश कदम, हिरेन अंजारा यांचा समावेश होता.

शिष्टमंडळाने देवरुखकर यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार व धीर देतानाच आवश्यक ती सर्व वैद्यकीय, आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाशी चर्चा केला. यातून रेल कामगार सेना रेल्वे कर्मचाऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असल्याचे यातून स्पष्ट झाले.