विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशी स्वीकारा, देशात कंगव्यापासून टुथब्रशपर्यंत सर्वकाही बाहेरचे; ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये विद्यार्थ्यांशी मोदींची स्वदेशी पे चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्या वेळी तुम्ही 39-40 वर्षांचे असाल. तुम्ही आताच विकसित हिंदुस्थानला तुमचे स्वप्न बनवायला हवे, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशी वस्तू स्वीकारण्याचा सल्ला दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रात देशभरातील विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी 5 राज्यांमधील दिल्ली, कोईम्बतूर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगड), देव मोगरा (गुजरात) आणि गुवाहाटी (आसाम) येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याबाबत पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी विद्यार्थ्यांना आसामचे पारंपरिक उपरणे घातले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील. त्या वेळी तुम्ही 39-40 वर्षांचे असाल. तुम्ही आत्ताच विकसित हिंदुस्थानला तुमचे स्वप्न बनवले पाहिजे. स्वातंत्र्याचं स्वप्न हृदयात जपून भगतसिंग फासावर गेले. स्वातंत्र्याच्या 25 आणि 30 वर्षांपूर्वी दिलेल्या बलिदानामुळे स्वातंत्र्य मिळाले. विकसित भारतासाठी तुम्हाला काय करायचे आहे याचे स्वप्न बनवा. या वेळी मोदींनी लेखन आणि शिकण्याची गती वाढवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

अभ्यासाच्या परिणामांवर लक्ष द्या, गुणांवर नाही

गुणांच्या स्पर्धेबाबत मोदी म्हणाले की, मला माहीत नाही की हे गुणांचे वेड कसे पसरले आहे. तुम्हाला गेल्या वर्षीच्या पहिल्या ते दहा वर्षांच्या पहिल्या क्रमांकाची नावे आठवतात का? हे यश तात्पुरते आहे. आपण आपल्या अभ्यासाचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, आपल्या गुणांवर नाही. कौशल्य आणि गुणांमध्ये समतोल साधायला हवा, असेही मोदी म्हणाले.