
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेला जाणाऱया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्टच्या जादा गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. शाळा व पालकांच्या मागणीनुसार त्या त्या भागात विशेष गाडय़ांची व्यवस्था केली जाणार आहे. किंबहुना, वाहतूक कोंडीमध्ये बस अडकू नयेत, यासाठी बेस्टचे अधिकारी जागोजागी तैनात राहणार आहेत.
बारावीची बोर्ड परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू राहणार आहे. या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचता यावे, यासाठी जादा बस फेऱयांची उपलब्धता करण्याची तयारी बेस्ट उपक्रमाने केली आहे. बोर्ड परीक्षांच्या काळात नियमित फेऱ्यांच्या तुलनेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष फेऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. शाळा आणि पालकांच्या विनंतीनुसार अतिरिक्त फेऱया चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापक व इतर अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना बसच्या पुढील दरवाजाने ‘एन्ट्री’
परीक्षेला जाणाऱया विद्यार्थ्यांशी चांगले वागा, त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करा, अशा सूचना बेस्ट उपक्रमाने चालक, वाहक तसेच निरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. बस थांब्यावर बसला अधिक उशीर होता कामा नये, या हेतूने परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना बसच्या पुढील दरवाजाने ‘एन्ट्री’ दिली जाणार आहे.



























































