
कश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट बनवून कोट्यवधींची कमाई केली जाते. पण इतर संवेदनशील विषयांवर चित्रपट का बनवले जात नाहीत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच केरळ फाईल्स बनवणाऱ्यांनी एप्स्टिन्स फाईल्सवर चित्रपट काढावा, बॉक्स ऑफिसवर खूप चालेल असा टोलाही त्यांनी लगावला.
पवार आणि ठाकरे कुटुंबांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “राजकीय मतभेदांमुळे वेगवेगळे मार्ग स्वीकारले असले तरी कुटुंब म्हणून ते एकच आहेत. मतभेदांची काळी छाया कुटुंबांवर पडू नये, अशी महाराष्ट्राची भावना आहे. पवार आणि ठाकरे कुटुंबे ही केवळ राजकीय नाहीत, तर महाराष्ट्राला दिशा देणारी कुटुंबे आहेत. सन्माननीय शरद पवार हे त्या कुटुंबातील ज्येष्ठ, ‘भीष्म पितामह’सारखे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आहेत.”
ते पुढे म्हणाले की, कुटुंबातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर कुटुंबाला आधार देणे हे शरद पवार यांचे कर्तव्य आहे आणि ते ते बजावत आहेत. “सुनेत्रा पवार यांनी त्यांचा पती गमावला आहे. उपमुख्यमंत्रीपद ही बाजूची गोष्ट आहे. पार्थ आणि जय यांनी त्यांचे वडील गमावले आहेत. अशा वेळी आजोबा म्हणून शरद पवार आपले कर्तव्य पार पाडत आहेत,” असे राऊत म्हणाले.
दरम्यान, चित्रपटांच्या संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, “संस्कार, संस्कृती आणि हिंदुत्वाची भाषा केली जाते. ‘कश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट बनवून कोट्यवधींची कमाई केली जाते. पण इतर संवेदनशील विषयांवर चित्रपट का बनवले जात नाहीत? ज्या निर्मात्यांनी ‘कश्मीर फाइल्स’मधून कमाई केली, त्यांनी एप्स्टिन फाईल्स वर चित्रपट बनवावा. गरज पडल्यास देशातील लोकांकडून निधी गोळा करूनही असे चित्रपट बनवता येतील. अशी फिल्म नक्कीच बनली पाहिजे, ती खूप दमदार ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

































































