
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
दिनचर्या आणि रात्रीचर्या संपूर्णत उलगडून सांगणे कठीण असते. यात आपल्याला प्रकृती, ऋतू आणि परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. या लेखातून आपल्याला मार्गदर्शन सूत्र मिळाले तरी नक्कीच सर्वांचा फायदा होईल.
आधीच्या लेखात आपण दिनचर्या थोडक्यात जाणून घेतली. त्याचा पुढचा भाग म्हणून रात्रीचर्या कशी अवलंब करावी ते आपण पाहू.
आयुर्वेदानुसार संध्याकाळ हा वाताचा काळ असतो. या काळात साधारणत: बस्तीकर्म केल्यास अधिक गुणकारी ठरते असा अनुभव आहे. या वात काळात आणि पिणाऱ्या पित्त, कफ कालावधीमुळे मनाची हुरहूर वाविनाकारण चिंता, भीती निर्माण होते. अशा वेळी मन स्थिर राहण्यासाठी देवासमोर काहीवेळ शांत बसणे अत्यंत आवश्यक आहे. असा वेळ नसेल, तर प्रवासात असाल, जिथे कुठे असाल तिथे नामस्मरण, रामरक्षा किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना केली पाहिजे, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल, व्यसनापासून दूर राहाल, हुरहूर व चिंता कमी होतील.
सगळ्या धर्माच्या संस्कृतीत हा संधी समय प्रार्थना आणि ध्यानासाठी महत्त्वाचा मानला आहे.
त्यानंतर येते जेवणाची वेळ. लवकर म्हणजे साधारणपणे 8.30 ला जेवणे अधिक फायद्याचे असते. उशिरा जेवण करणे आणि लगेच झोपणे हे लठ्ठपणा, मधुमेह आणि त्याबरोबर अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे. नोकरदारांची परिस्थिती अजून वेगळी आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री आरामात आणि भरपेट जेवण जेवले जाते, ज्यात कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात जसे की भात, गहू, गोड पदार्थ. असे पदार्थ जेऊन लगेच झोपल्यावर साहजिकच शरीराचे वजन वासतत आम्लपित्त होणे हे दुष्परिणाम दिसू लागतात. सध्या पाश्चिमात्य देशांमध्ये वन पॉट मीलचे फॅड आहे. आपल्याकडे ते पूर्वीपासून सांगितले आहेत. उदाहरणार्थ- डाळ ढळी किंवा वरणफळ, डाळ तांदळाची खिचडी, उकड इत्यादी. त्यामध्ये अजून काही पदार्थ वाशकतो. उदाहरणार्थ- सलाड आणि उकडलेले चिकन अथवा पनीर किंवा सोयाचंक, पापलेट, बांगडासारखे काळ्या पाठीचे मासे मीठ व मसाला लावून अख्खा आणि तेवच खाणे असे अनेक पर्याय आहेत, ज्यामुळे दिवसभराचं पोटही भरेल आणि आवश्यक ती प्रथिनेदेखील मिळतील.
जेवणानंतर शतपावली घालावी, परंतु उगाच भरपूर चालणे, बॅडमिंटनसारखे अतिव्यायाम करू नये. त्याचा परिणाम अन्न पचन न होणे आणि झोप कमी होणे असा होऊ शकतो.
निद्रा
निद्रा आयुष्याच्या तीन महत्त्वाच्या आधार स्तंभांपैकी एक आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप हे दीर्घायुष्याचे रहस्य आहे. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्या आणि आजारपणाला आमंत्रण मिळते.
वेळ मिळेल तसे झोपणे हे वृद्ध व्यक्तींना, शिफ्टच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना आवश्यक आहे. परंतु निरोगी तरुण लोकांनी दिवसा झोपणे हे अनेक रोगांना कारणीभूत ठरते.
निद्रावस्थेत शरीर स्वतच स्वतःला दुरुस्त आणि रोगापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असते. ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. अखंड सहा-सात तास झोप मिळणे सध्या बहुतांशी लोकांना अवघड झाले आहे. ध्वनी प्रदूषण, मोबाईलचा वापर, विजेचा लपंडाव, बदलणारे हवामान, चिंता, नैराश्य, अतिविचार यामुळे एकंदरीतच झोपेची गुणवत्ता आणि मात्रा कमी होत आहे, त्यावर गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
दिनचर्या आणि रात्रीचर्या या दोन-तीन लेखांत उलगडून सांगणे कठीण आहे. प्रकृती, ऋतू आणि परिस्थितीनुसार त्यात बदल करावे लागतात. या लेखातून आपल्याला मार्गदर्शन सूत्र मिळाले तरी नक्कीच सर्वांचा फायदा होईल.

























































