
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (८ फेब्रुवारी २०२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या ब्लॉकच्या काळात काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी योची दखल घेत प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे धिम्या मार्गावर ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार (अप व डाऊन धिम्या मार्गावर) ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे ब्लॉकच्या काळात धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या गाड्या मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार नाहीत.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान (अप व डाऊन धिम्या मार्गावर) ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत असेल. या काळात धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे त्या विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी हार्बर मार्गावरील (चर्चगेट–गोरेगाव) सेवा उपलब्ध असेल.
हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार असल्याने या मर्गावरील सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. पनवेल ते वाशी (अप व डाऊन मार्ग – पोर्ट मार्ग वगळून) सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंत ब्लॉक घएण्यात येईल. त्यामुळे या काळात पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील. पनवेल-ठाणे दरम्यानची ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे बंद असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे–वाशी/नेरूळ दरम्यानची ट्रान्स हार्बर सेवा नियमित सुरू राहील. पोर्ट मार्गावरील रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.





























































