अटल सेतूवर हेलिपॅडची सुविधा तातडीने उभारा, आमदार मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅसचा टँकर उलटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 36 तासांची अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. यामध्ये वृद्ध नागरिक, महिला, मुलांसह अनेकांचे अतोनात हाल झाले. या पार्श्वभूमीवर शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणेच्या अभावाकडे शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष पत्राद्वारे वेधले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अटल सेतूवर हेलिपॅडची सुविधा तातडीने उभारा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोगद्यानजीक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुंबईकडे येणाऱया मार्गावर गॅसचा टँकर उलटल्याने अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. टँकरमधील प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाल्याने या महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे शेकडो वाहने या महामार्गावर अडकून पडली. मी स्वतः बारामतीला याच मार्गाने सकाळी जात होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती मी स्वतः डोळ्याने पाहिली होती. या घटनेमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आपत्कालीन यंत्रणाच सक्षम नसल्याची बाब आता अधोरेखित झाली आहे. शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू मार्गावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वाहतूककोंडीबरोबरच सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आहे.

आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेण्यात यावा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटनेमुळे शिवडी-न्हावा शेवा या भारतातील सर्वात लांब सागरी पुलाच्या आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणांना निर्देश देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी. तसेच हेलिपॅडसारख्या सुविधा तातडीने करण्यात यावी, असे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.