
जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजूर येथून फुलंब्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरगाव फाटा परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याबाबत बदनापूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. हा गुटखा पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून नेला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या पथकाला सतर्क करून दाभाडी परिसरात नाकाबंदी व शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले.
काही वेळानंतर संशयित स्कॉर्पिओ वाहन दाभाडीच्या दिशेने येताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर वाहन अडवून स्कॉर्पिओ ताब्यात घेण्यात आली. वाहनाची सखोल झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. पंचनामा करून केलेल्या तपासणीत गुटख्याची किंमत सुमारे २ लाख ४९ हजार ३६० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी संदीप दत्ता भूमकर (रा. राजूर, ता. भोकरदन), रमेश गावंडे (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि रवी प्रभाकर फुके (रा. उंबरखेड, ता. भोकरदन) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला गुटखा तसेच स्कॉर्पिओ वाहन असा मिळून सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कारवाई बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोलीस स्टेशन बदनापूर, तसेच पोलीस कर्मचारी दासार, नितिन वाघमारे, दीपक कराड, पूनमसिंग गोलवाल, पिल्लेवाड आणि चालक कुंटे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या केली.



























































