
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून परतताना 84 वर्षीय ज्येष्ठ मतदाराचा मतदान केंद्र परिसरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूरच्या निलंगा तालुक्यात घडली आहे.
विश्वनाथ शरणप्पा तुपडे (वय 84, रा. औराद शहाजानी, ता. निलंगा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजता ते अत्यंत उत्साहाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते. मात्र, केंद्रावर व्हीलचेअर मोडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना चालतच आत जावे लागले.
मतदान करून घरी परतत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत त्रास सुरू झाल्याने केंद्राबाहेरील प्रवेशद्वाराजवळच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
यावेळी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी त्वरित तुपडे यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जीव वाचविण्यात यश आले नाही. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. तुपडे यांच्यावर रविवारी सकाळी 11 वाजता औराद शहाजानी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही ज्येष्ठांनी मतदान केंद्रावर येणे टाळले. 84 वर्षीय सिद्रामप्पा लातुरे हेही मतदानासाठी आले होते; मात्र व्हीलचेअर मोडलेली असल्याने त्यांनी वॉकरच्या सहाय्याने केंद्रात जाऊन मतदान केले. नंतर दुसरी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्याचे झोनल अधिकाऱ्यांनी सांगितले.



























































