Ratnagiri News – मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात बेकायदेशीर प्रचार, शिवसेना उमेदवाराची पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या मतदान प्रक्रियेदरम्यान लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला काळिमा फासणारा प्रकार संगमेश्वर तालुक्यात उघडकीस आला आहे. मतदान केंद्राच्या अवघ्या २०० मीटर परिसरात उघडपणे प्रचार केल्याचा गंभीर आरोप करत मूचरी (गट क्रमांक ४३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार प्रा. ललिता रोहित तांबे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी सुमारे ४.३० वाजता, मतदान केंद्र क्रमांक ४३/२४, जिल्हा परिषद केंद्र शाळा, मुचरी (नूतन-जुनी इमारत) येथे उमेदवार म्हणून भेट देण्यासाठी जात असताना, मतदान केंद्राच्या २०० मीटर प्रतिबंधित परिसरात एका दुकानाच्या व्हरांड्यात दोन इसम बेकायदेशीररित्या प्रचार करत असल्याचे निदर्शनास आल्याचा स्पष्ट उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या नियमानुसार ठेवलेल्या अंतराच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रचार, मतदारांना प्रवृत्त करणे, चिन्हे, फोटो, स्लिप्स वाटप करणे हा दंडनीय गुन्हा आहे. मात्र, या नियमांना धाब्यावर बसवत संबंधित इसमांकडे शिंदे गट उमेदवार माधवी गिते व अजित पवार गटाचे उमेदवार आरुषी घवाळी यांचे फोटो, निवडणूक चिन्ह असलेली डमी मशीन पत्रके, महायुतीतील नेत्यांचे फोटो असलेल्या मतदार स्लिप्स तसेच पांढरी पाकिटे आढळून आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हे साहित्य वापरून मतदारांना ठरावीक उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवृत्त केले जात होते, असा गंभीर दावा करण्यात आला आहे. सदर इसमांनी आपली नावे सांगण्यास नकार दिला. मात्र स्थानिक नागरिकांकडून त्यांची नावे शांताराम गणू टोपरे व शिवम संतोष सुर्वे (रा. मुचरी, ता. संगमेश्वर) असल्याचे समजल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून, घटनेची तात्काळ माहिती मतदान केंद्राध्यक्ष तसेच संगमेश्वर तहसीलदार यांना देण्यात आल्याचेही प्रा. तांबे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचा जाणीवपूर्वक भंग, तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम व भारतीय दंड संहितेतील तरतुदींनुसार हा प्रकार गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरत असल्याचे नमूद करत, प्रा. ललिता रोहित तांबे यांनी शिंदे गटाच्या माधवी गिते, अजित पवार गटाच्या आरुषी घवाळी तसेच शांताराम टोपरे व शिवम सुर्वे यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता अबाधित राहणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. संगमेश्वर तालुक्यामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याची परंपरा आहे. मात्र या घटनेने परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे तालुकाभरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे