
इंडिगो एअरलाइन्सचे पायलट प्रदीप कृष्णन यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला त्यांच्या आयुष्यातील ‘सर्वात कठीण एडिट’ असे म्हटले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला प्रदीप फ्लाइटमध्ये अनाऊन्समेंट करताना दिसतात आणि प्रवाशांमध्ये बसलेली त्यांची आई अभिमानाने हसताना दिसते. काही क्षणांनंतर विमानातून उतरत असलेली त्यांची आई आकाशात देवदूताच्या रूपात दाखवली जाते आणि स्क्रीनवर ‘माझी रक्षक, माझी एंजल’ असा संदेश दिसतो. पोस्टमध्ये प्रदीप यांनी लिहिले की, ते आधी कधी देवावर विश्वास ठेवत नव्हते, पण आता त्यांच्या आयुष्यात प्रार्थना करण्यासाठी एक ‘देव’ आहे, त्यांची आई. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱयांनी प्रदीप यांना धीर देत त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली.



























































