ICC T20 WC 2026 – पाकिस्तानने गुडघे टेकले! मागण्या धुडकावून लावताच पीसीबीची शरणागती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानविरुद्ध क्रिकेट खेळायची वेळ आली की पाकिस्तानला अचानक राजकारण, कूटनीती आणि तत्त्वांची आठवण होते. मैदानावर खेळायचे नसते, पण चर्चेच्या टेबलावर अटींचा पाऊस पाडायचा हीच पाकिस्तानची जुनी आणि नेहमीची चाल आहे. टी-20 वर्ल्ड कपदरम्यान हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देत पाकिस्तानने पुन्हा एकदा क्रिकेटचा वापर राजकीय दबावासाठी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीसीबीने केलेल्या मागण्या फेटाळत आयसीसीने उधळून लावत त्यांच्यावर आपल्या निर्णयाला मागे घेण्याची स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे उद्या पाकिस्तानने बहिष्काराच्या निर्णयातून माघार घेतली तरी कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानला बहिष्कार खूपच महागात पडण्याची शक्यता असल्यामुळे ते हिंदुस्थानविरुद्ध मैदानात उतरतील असे संकेत मिळू लागले आहेत.

15 फेब्रुवारीला हिंदुस्थानविरुद्धचा बहिष्कार मागे घेण्यासाठी पीसीबीने आयसीसीसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. एक म्हणजे, हिंदुस्थान-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याची गॅरेंटी, दुसरी आयसीसीच्या उत्पन्नातील वाटा वाढवून मिळावा आणि नो-हँडशेकसारख्या मुद्दय़ांवर वेगळी नियमावली करावी अशी मागणी केली होती. याशिवाय बांगलादेशच्या नावाखाली भरपाईचीही मागणी करत स्वतःचा फायदा साधण्याचा प्रयत्न केला. आयसीसीने मात्र या सर्व मागण्यांना फेटाळून लावत नियम सर्वांसाठी समान असल्याचे ठणकावून सांगितले.

स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी पाकिस्तानने बीसीसीआयवर आरोप करत आपले रडगाणे सुरूच ठेवले आहे. आयसीसीवर हिंदुस्थानचा प्रभाव असल्याचा आरोप करत मैदानावर हरायची भीती चर्चेत आरडाओरड करून लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे क्रिकेटविश्वात खुलेपणाने बोलले जात आहे.

दरम्यान, सामना रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होईल, असा इशारा श्रीलंका आणि अमिराती क्रिकेट मंडळांनी दिल्याने पाकिस्तानची कोंडी वाढली आहे. वर्षानुवर्षे मदत करणाऱयांनीच आता आरसा दाखवल्याने पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. त्यामुळे पीसीबीची चोहोबाजूंनी कोंडी झाली असून ती आता 15 फेब्रुवारीचा सामना खेळूनच फुटू शकते अशी खात्री पाकिस्तानला झाली आहे.

त्यामुळे पीसीबीने हिंदुस्थानी संघाविरुद्ध खेळण्याचा निर्णय पाकिस्तानी सरकारवर ढकलला आहे. काल पीसीबी आणि
बीसीबी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तान आयसीसीपुढे गुडघे टेकणार हे संकेत मिळाले होते. आता त्यांच्याकडे हिंदुस्थानविरुद्ध सामना खेळण्याशिवाय पर्यायही उरलेला नाही. जर 15 फेब्रुवारीला हिंदुस्थानविरुद्ध ते मैदानात उतरले नाही तर क्रिकेटविश्वात त्यांची उरलेली विश्वासार्हताही संपुष्टात येईल.