
टी-20 वर्ल्डकपला अखेर खरी धार येऊ लागली असताना पाकिस्तान आणि अमेरिका आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांचे पहिल्या सामन्यांचे निकाल सहज उलटेही लागू शकले असते. पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्ध फहीम अश्रफच्या शेवटच्या ओव्हरमधील झुंजार खेळीवर कसाबसा विजय मिळवला, तर हिंदुस्थानविरुद्ध अमेरिकेला ऐतिहासिक अपसेटची संधी असूनही सूर्यकुमार यादवच्या वादळी फलंदाजीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे कोलंबोतला सामना दोन्ही संघांसाठी बाद फेरीसारखाच ठरणार आहे.
अमेरिकेला पाकिस्तानचा इतिहास ठाऊक आहे. दोन वर्षांपूर्वी याच प्रतिस्पर्ध्याला सुपर ओव्हरमध्ये नमवण्याचा पराक्रम अमेरिकेने केला होता. त्यानंतर न्यूझीलंडला झुंज देत आणि हिंदुस्थानला हादरवत अमेरिकेने पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याची क्षमता आपल्यात असल्याचे दाखवले आहे. अली खान आणि शुभम रांजणेच्या दुखापती अडचणीच्या ठरू शकतात, तरी व्हॅन शालविकची शिस्तबद्ध वेगवान गोलंदाजी आणि मोहम्मद मोहसिन व हरमीत सिंगची फिरकी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू शकते.
पाकिस्तानसाठी नेदरलँड्स-विरुद्धचा विजयही इशारा देणारा ठरला. सहज जिंकता येणारा सामना हातातून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मागील तीन आयसीसी स्पर्धांत पहिल्याच फेरीत बाहेर फेकल्या गेलेल्या पाकिस्तानचा आत्मविश्वास अजूनही डळमळीत आहे. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मजबूत असले, तरी मधली फलंदाजी दबावाखाली क्षणार्धात कोसळते, ही मोठी चिंता आहे. बाबर आझमची फॉर्मबाहेरची कामगिरी, ऑलराउंडर्सची जास्त गर्दी आणि फलंदाजांची कमकुवत साखळी अमेरिकेला संधी देऊ शकते.
ICC T20 WC 2026 – पाकिस्तानने गुडघे टेकले! मागण्या धुडकावून लावताच पीसीबीची शरणागती
संभाव्य संघ असे असतील
पाकिस्तान – साहिबजादा फरहान, सईम अयुब, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, शादाब खान, उस्मान खान किंवा ख्वाजा नफाय (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा आणि अबरार अहमद.
अमेरिका – ऑण्ड्रिज गौस (यष्टिरक्षक), साईतेजा मुकमल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसिन, शॅडली व्हॅन शालविक, अली खान किंवा जसदीप सिंग आणि सौरभ नेत्रावळकर.




























































