आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा – मनु भाकरला रौप्य, ईशा सिंहला कांस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरचे आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक थोडक्यात हुकले. 25 मीटर पिस्टल प्रकारात तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत सुवर्णपदक विजेती व्हिएतनामची एनगुयेन थुय ट्रेंग आणि मनु या दोघींनीही 35 असे समान गुण मिळविले. त्यानंतर शूट-ऑफद्वारे विजेती ठरवण्यात आली, ज्यात ट्रेंगने बाजी मारली.

मनुसह हिंदुस्थानची आणखी एक नेमबाज ईशा सिंह हिने कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत माजी आशियाई एअर पिस्टल विजेती ट्रेंग, मनु, ईशा आणि ऑलिम्पियन रिदम सांगवान यांच्यात सुवर्णासाठी चुरशीची लढत रंगली होती. ईशाने पहिल्या सीरिजमध्ये परफेक्ट पाच गुणांची सुरुवात केली, तर मनु आणि ट्रेंग यांनी प्रत्येकी चार गुण मिळवले. प्रत्येक सीरिजनंतर पदक शर्यतीतील स्थिती बदलत होती; मात्र सहाव्या सीरिजमध्ये परफेक्ट पाच गुणांसह ट्रेंगने दोन गुणांची आघाडी घेतली.

सातव्या सीरिजमध्ये ट्रेंगकडून केवळ एकच निशाणा लागल्याने मनु आणि ईशाने अंतर कमी केले. आठव्या सिरीजनंतर 30 गुणांसह आघाडीवर असलेली ईशा नवव्या सिरीजमध्ये सर्व शॉट्स चुकवून बसली आणि तिला कांस्यवर समाधान मानावे लागले. अंतिम सिरीजमध्ये मनुने तीन, तर ट्रेंगने दोन निशाणे साधली; त्यामुळे दोघींचा एकूण स्कोअर 35 झाला आणि सामना शूट-ऑफपर्यंत गेला.

हिंदुस्थानला सांघिक स्पर्धेत सुवर्ण

सांघिक स्पर्धेत ईशा सिंह, मनु भाकर आणि रिदम सांगवान या हिंदुस्थानी तिकडीने एकूण 1,751 गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. 1,735 गुणांसह चायनीज तैपेने रौप्य, तर 1,729 गुणांसह व्हिएतनामने कांस्य पदक मिळवले.

नाम्या कपूरला शूट ऑफमध्ये सुवर्ण

ज्युनियर 25 मीटर पिस्टल अंतिम फेरीत नाम्या कपूर हिने थरारक शूट-ऑफमध्ये सुवर्ण पदक पटकावले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी सर्वात कमी वयाची हिंदुस्थानी खेळाडू ठरलेल्या नाम्याने इंडोनेशियाच्या रिहादतुल अस्यिफाला मागे टाकले. अंजली भागवत हिने कांस्यपदक जिंकले. ज्युनियर हिंदुस्थानी संघानेही या प्रकारात संघ सुवर्ण पटकावले.