भ्रष्टाचाराचा आणखी एक पुरावा; सुरू होण्याआधीच एफओबीने मान टाकली, मुंबई-बडोदा महामार्गावरील नवा पादचारी पूल सांध्यात मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहाडोली येथे उभारण्यात आलेल्या नवा पादचारी पूल सुरू होण्यापूर्वीच सांध्यात मोडल्याने भ्रष्टाचाराचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. डंपरची धडक लागून फूट ओव्हर ब्रीज कलंडल्याचे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हात वर केले. जी. आर. इन्फ्रा कंपनीने पुलाचे काम निकृष्ट केल्यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मुंबई-बडोदा महामार्गावरील काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गाच्या पॅकेज १३ जवळ असलेल्या बहाडोली, खामलोली आणि बायांचा पाडा यांच्यासह इतर आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. या पुलाच्या कामाचा ठेका जी. आर. इन्फ्रा या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे रविवारी बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनाची धडक लागून हा पूल एका साईडला कलंडला. दुर्घटनेनंतर ठेकेदाराने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पादचारी पूल सुरू झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास सोपा होणार असून त्यांचा मोठा फेरा वाचणार आहे. मात्र पूल सुरू होण्याआधीच दुर्घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. डंपरची धडक बसून पूल कलंडल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले असले तरी ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळेच हा पूल मोडल्याचा आरोप ग्रामस्थ प्रकाश खरात यांनी केला आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळावा याकरिता ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जी. आर. इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या अवजड वाहनाची पादचारी पुलाच्या खांबाला घडक बसल्यामुळे पूल एका बाजूला कलंडला आहे. त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालघर.