
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि आज त्यांनी पदभार स्वीकारत विधीवत कामकाजाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, तसेच इतर मंत्री, आमदार उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार, आदिती तटकरेंना अश्रू अनावर झाले.
उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी आणि नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशीर्वाद घेतले.

त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, पार्थ अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रालयात पोहोचल्या. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन पती आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय, असे रोहित पवार यांनी म्हटले.
ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज मा. सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2026
दरम्यान, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थखाते वगळता अजित पवारांकडे असलेली क्रीडा आणि उत्पादन शुल्क ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर राजकीयदृष्ट्या प्रभावी मानला जाणारा पुणे जिल्हा आणि बीड हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा यांची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली .


























































