
मिंधे आणि अजित पवार यांच्या गटाने अमित शहा यांची भेट घेणे, यात काही नवीन नाही. या दोन्ही गटाच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत, खासदार संजय राऊत यांनी सांगत मिंधे, अजित पवार गट आणि भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे. तसेच भाजपला मदत होईल, असा कोणताही निर्णय़ घेणार नाही, ही आमची ठाम भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मिंधे आणि अजित पवार यांच्या गटाने अमित शहा यांची भेट घेणे, यात काही नवीन नाही. आता मिंधे आणि अजित पवार यांच्या गटाचे पुढे काय करायचे, याबाबतच्या चर्चा झाल्या असतील. मात्र, जोपर्यंत अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस याबाबत काही माहिती देत नाहीत, तोपर्यंत त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. तसेच विलीनीकरण म्हणजे काय, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट भाजपात विलीन करणार आहेत काय, असे अनेक प्रश्न असू शकतात. अमित शहा यांचेच हे दोन पक्ष असल्याने त्यांना अमित शहा यांच्यशी चर्चा करावीच लागते, असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह बेकायदेशीरपणे अजित पवार यांच्या गटाकडे गेले आहे. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह बेकायदेशीरपणे मिंधे गटाकडे गेले आहे. त्यामुळे त्यांना यश मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही गटाच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे लागतात, असे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, एकवेळ आपल्याला विरोधी बाकांवर बसावे लागले, तरी चालेल मात्र, भाजपला मदत होईळ किंवा त्यांची सत्ता येईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये, असे ते म्हणाले. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. संभाजीनगरमध्ये एका बाजूला एमआयएम आहे आणि दुसऱ्या बाजूला गद्दारांचे पक्ष आहेत. त्यामुळे तिथे आम्ही तटस्थतेची भूमिका घेतली आहे. त्यांच्यासोबत जाणे म्हणजे मतदारांशी बेईमानी करण्यासारखे आहे. त्यामुळे आमचे नेते अंबादास यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे.


























































