
T20 World Cup 2026 मध्ये मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) चौकार आणि षटकारांची तुफान बरसात पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या सलामीविरांनी UAE च्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्यांची चांगलीच धुलाई केली. UAE ने उभा केलेला 173 धावांचा डोंगर न्यूझीलंडने 92 चेंडूंमध्येच भेदून काढला विक्रमी भागीदारी करत 10 विकेटने दणदणीत विजयी जल्लोष केला. न्यूझीलंडने स्पर्धेतील दुसरा विजय साजरा करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाच सिंहासन काबीज केलं आहे.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीम सायफर्टचं वादळ पुन्हा एकदा गोंगावलं. अफगाणिस्तानच्या चिंध्या उडवल्यानंतर UAE चा सुद्धा फडशा पाडण्यात सायफर्ट यशस्वी ठरला. त्याला साथ मिळाली फिन एलनची. सायफर्टच्या पावलावर पाऊल ठेवत त्यानेही धुवांधार खेळ करत गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी मिळून 92 चेंडूंमध्ये 175 धावांची विजयी भागीदारी करत इतिहास रचला आहे. टी20 वर्ल्ड कपमधील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. टीम सायरफर्टने 42 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. तर, फिनने 50 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 84 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे UAE ने दिलेले 176 धावांचे आव्हान अवघ्या 15.2 षटकांमध्ये पूर्ण झाले.
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक भागीदारी करण्याचा विक्रम आता टीम सायफर्ट आणि फिन एलनच्या यांच्या नावावर झाला आहे. यापूर्वी 170 हून अधिक धावांची भागीदारी करण्यात कोणत्याही जोडीला यश आलं नव्हत. यापूर्व हा विक्रम इंग्लंडच्या जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स (170) यांच्या नावावर होता. या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेची जोडी आहे. क्विंटन डिकॉक आणि रॉसो यांनी बांगलादेशविरुद्ध 168 धावांची भागीदारी केली होती.


























































