
कर्जत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला मतदारांनी साफ झिडकारले. सुजाण मतदारांनी भाजप, शिंदे गटाच्या घराणेशाहीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. नेत्यांच्या कुटुंबीयांना मतदारांनी मतयंत्रातून चांगलीच चपराक दिली.
भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या भावजय राधिका ठाकरे यांचा माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटात पराभव झाला. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सुदाम पवाळी यांच्या पत्नी संध्या पवाळी यांना कडाव पंचायत समिती गणामध्ये पराभूत व्हावे लागले. भाजप रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेश भगत यांच्या पत्नी सुप्रिया भगत या उकरूल पंचायत समिती गणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.
भाजपचे नेरळ मंडळ अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने यांचा दामत पंचायत समिती गणामध्ये पराभव झाला. भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन कांदळगावकर यांच्या पत्नी तथा महिला मंडळ अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांचा नेरळ पंचायत समिती गणामध्ये दारुण पराभव झाला. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या पत्नी सुनीता टोकरे यांचा नेरळ जिल्हा परिषद गटातून पराभव झाला. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांचा उकरूल पंचायत समिती गणामध्ये पराभव झाला.
मतदारांचा स्पष्ट संदेश
या निकालातून कर्जत तालुक्यातील मतदारांनी घराणेशाही, सत्तेचा दबाव आणि राजकीय दडपशाहीला नकार देत परिवर्तनाला कौल दिला आहे. कर्जत परिवर्तन आघाडीचे नेतृत्व, संघटन आणि स्थानिक कामांना मिळालेली ही पावती मानली जात असून, महायुतीसाठी हा | पराभव गंभीर आत्मपरीक्षणाचा विषय ठरला आहे.


























































