
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून 100 टक्के घातपात आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस-आमदार रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीतही केला. रोहित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला गेले होते. भेटीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
मृतदेह प्रमाणापेक्षा जास्त सुजला होता
अपघातानंतर अजितदादांचे शरीर असामान्यरीत्या सुजले होते, असे ते म्हणाले. दादांचे शरीर इतके सुजलेले कसे असे आपण विचारले होते. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेली माहितीही धक्कादायक होती. आगीमध्ये मृत्यू झाल्यास शरीराला सूज येते पण अजितदादांचे शरीर प्रमाणापेक्षा जास्त सुजले होते, असे डॉक्टरांनी सांगितले होते. ते का सुजले होते त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे, असे रोहित पवार म्हणाले.




























































