
दक्षिण मुंबईची वाहतूककोंडी फोडणारा कोस्टल रोड आता देशातील पहिलाच ‘म्युझिकल मार्ग’ बनला आहे. यामध्ये रस्त्यावरील संगीत पट्टय़ावरून गाडी गेल्यानंतर ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकता येणार आहे. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ही संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी ठरणार आहे.
कोस्टल रोडवर नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्टय़ांवरून वाहन गेल्यावर ‘जय हो’ हे गाणे ऐकू येते. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच पऱयोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. ही संकल्पना वाहनचालक, प्रवाशांना आनंद देणारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी संगीत मार्ग संकल्पनेचा आनंदही घेतला. यावेळी हंगेरीचे वाणिज्य दूत फॅरेन जारी, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
असा आहे उपक्रम…
n कोस्टल रोडवर पहिल्या टप्प्यात 500 मीटर अंतराच्या रस्त्यावर ही संकल्पना राबविण्यात आली आहे. यापुढेही संगीत मार्ग ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
n नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर संगीत पट्टे बसविले आहेत. वाहन या पट्टय़ांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून प्रवाशांना ऐकू येते.
n आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, यूएई येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत.





























































