राष्ट्रगीताआधी वंदे मातरम्! मोदी सरकारचा नवा फतवा, सहा कडवी म्हणावी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या निवडणुका आल्याची दवंडी मोदी सरकारने दिली आहे. आता राष्ट्रगीताच्या अगोदर वंदे मातरम् म्हणावे, असा फतवाच मोदी सरकारने काढला आहे. संपूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् गाण्यासाठी 3 मिनिटे 10 सेकंदांचा वेळ लागतो. तेवढा वेळ उभे राहून सन्मान देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार काहीही करून घालवायचे या गंडाने पछाडलेल्या मोदी सरकारने अलीकडेच 150 वर्षे पूर्ण झाली म्हणून वंदे मातरम्वर संसदेत चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर आता केंद्रीय गृह खात्याने वंदे मातरम् गाण्याचा राजशिष्टाचारच जारी केला आहे. राजकीय समारोह, संस्थात्मक कार्यक्रम, ध्वजारोहण, राष्ट्रपती तसेच राज्यपालांच्या कार्यक्रमात तसेच प्रस्थानाच्या वेळी राष्ट्रगीताच्या अगोदर वंदे मातरम् म्हणावे लागणार आहे. यासंदर्भातील नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

सध्या वंदे मातरम्च्या सहा कडव्यांपैकी पहिली दोनच कडवी गायली जातात. नव्या नियमानुसार संपूर्ण वंदे मातरम्ची सहाही कडवी गाणे बंधनकारक आहे. या नियमावलीतून सिनेमागृहांना सूट देण्यात आली आहे. चित्रपटगृहांमध्ये वंदे मातरम् वाजवणे अनिवार्य नाही. एखाद्या चित्रपटात वंदे मातरम्चा उपयोग करण्यात आला असेल आणि पडद्यावर ते वाजत असेल तर उभे राहण्याचीही गरज नसल्याचे नव्या नियमावलीत म्हटले आहे.

अशी आहे नियमावली…

– कोणत्याही कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् गायले जाणार असेल तर अगोदर वंदे मातरम् गावे लागेल.
– गीताच्या सन्मानार्थ सावधान मुद्रेत उभे राहावे लागेल.
– विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्रतिकांबद्दल आदरभाव उत्पन्न व्हावा यासाठी हा नियम.
– एखादा बॅण्ड वंदे मातरम् गाणार असेल तर अगोदर ढोल किंवा बिगुल वाजवून संकेत देणे गरजेचे.