
अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून व्हीएसआर कंपनीवर तोफ डागत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज खळबळजनक दावा केला. ‘2023 च्या अपघाताबाबत माहिती न मिळाल्याने युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने व्हीआरएस विमान कंपनीचा परवाना रद्द केला होता. नागरी उड्डाण महासंचालनालयामार्फत त्या अपघाताचा सविस्तर अहवाल युरोपियन संस्थेला जाणार होता, मात्र एका राजकीय व्यक्तीने तो मुद्दाम रोखला,’ असा आरोप रोहित पवार यांनी केला.
व्हीएसआर कंपनीच्या विमानांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत यावेळी त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘मुख्यमंत्री, मंत्री, काही नेते तसेच काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही व्हीएसआरच्या विमानाचा वापर केला होता. मात्र व्हीएसआरकडून विमानांची योग्य देखभाल होत नाही. 2024 मधील मुंबईतील अपघात आणि अजित पवार यांच्या अपघातामागे हाच निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असे ते म्हणाले. ‘आपत्कालीन परिस्थितीतही कोणी या कंपनीचे विमान वापरू नये,’ असे आवाहन त्यांनी केले. व्हीएसआरच्या विमानांच्या देखभाल नोंदी, पायलटच्या फिटनेसबाबतची कागदपत्रे सार्वजनिक करा, अशी मागणीही त्यांनी केली. अजितदादांच्या अपघाताचा सखोल तपास होऊन सत्य समोर आले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित तपास यंत्रणांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. आमच्या सर्व शंकांचे निरसन होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करतच राहू, असे रोहित पवार म्हणाले.
शांभवी पाठकवर आक्षेप नाही!
‘विमान कोसळणार याचा अंदाज आल्यामुळेच सहवैमानिक शांभवी पाठक ‘ओह शिट…ओह शिट’ बोलल्या असतील, कारण त्यानंतर 9-10 सेकंदांतच विमान कोसळले. विमान प्रमाणापेक्षा खाली आल्यानंतरही धोक्याचा इशारा देणारी स्टॉल वार्ंनग सिस्टम सुरू झाली नव्हती, कदाचित ती बंदच असावी,’ असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. शांभवी पाठक यांच्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. मुख्य आक्षेप पायलट सुमीत कपूर यांच्यावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हीएसआर कंपनीची अफरातफर
– पायलटच्या एका डय़ुटीनंतर 12 तासांचा विश्रांती कालावधी असतो; तो नियम कंपनी पाळत नाही.
– विमानांतील कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर बंद ठेवला जातो.
– उड्डाणापूर्वी आवश्यक चेकलिस्ट आणि टेकलॉग मेंटेन केली जात नाहीत.
– विमानांतील उपकरणांचे आयुष्य संपले तरी ती बदलली नाहीत.
– अजितदादांच्या विमानाने 100 तास उड्डाण केले असतानाही 50 तास दाखवले गेले.
रोहित पवार यांचे सवाल
– उड्डाणापूर्वी अनिवार्य असलेली वैद्यकीय तपासणी आणि अल्कोहोल चाचणी योग्य प्रकारे करण्यात आली होती का?
– पायलट बदलण्यामागे ‘वाहतूक कोंडी’चे कारण दिले गेले. इतक्या पहाटे मुंबईत ट्रफिक जाम असणे शक्य नाही?
– ऐन वेळी पायलट बदलण्याचा निर्णय नेमका कुणी आणि का घेतला?
– अपघातापूर्वीच्या शेवटच्या एका मिनिटात नेमके काय घडले? विमानाचा ट्रान्सपॉंडर का बंद होता?
– डीजीसीएच्या नियमानुसार 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असताना 3000 मीटरवर लँडिंग का करण्यात आले?
– विमानाचे वय, ऑपरेटरचा पूर्वीचा सुरक्षा रेकॉर्ड आणि मानक कार्यपद्धतींचे पालन झाले होते का?




























































