
राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या सुमारे 11 हजार जागा रिक्त आहेत. प्राध्यापकांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकवणीवर होत आहे. त्यामुळे या रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात, अशी मागणी वर्षानुवर्षे होत असूनही राज्य शासनाने त्यातील फक्त अर्ध्याच म्हणजे 5500 जागा भरण्याचे ठरवले आहे.
प्राध्यापकांच्या 5500 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी मुंबईत पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
राज्यात 70 हजार सरकारी पदांची भरती लवकरच केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. प्राध्यापकांच्या 11 हजार रिक्त जागा त्यामध्ये भरल्या जाऊ शकत होत्या; परंतु सरकारने प्राध्यापकांच्या फक्त 5500 जागा भरण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या प्राध्यापक भरतीला मुहूर्त मिळणार असला तरी सर्व 11 हजार जागा भरल्या गेल्या तर उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होईल, असे मत शिक्षणक्षेत्रात व्यक्त होत आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्राध्यापकांच्या निवडीसाठी राबवल्या जाणाऱया कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. भरती प्रक्रियेत उमेदवाराच्या शैक्षणिक कारकीर्द आणि संशोधनासाठी 60 टक्के, शैक्षणिक कौशल्यासाठी 20 टक्के तर मुलाखतीसाठी 20 टक्के गुण दिले जाणार आहेत. भरतीचा निकाल संबंधित विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.






























































