नरवणे यांच्या पुस्तकाचा वाद : दिल्ली पोलिसांनी घेतली पेंग्विनच्या कार्यालयाची झडती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे अप्रकाशित पुस्तक बाजारात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन इंडियाच्या गुरुग्राम येथील कार्यालयात आज दिल्ली पोलीस पोहोचले आणि तिथे झाडाझडती घेतली. यावेळी काही कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावरून सध्या देशात राजकीय गदारोळ उठला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा उल्लेख करून सभागृहात चिनी सैन्याच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, अप्रकाशित पुस्तकाचा आधार घेऊन काहीही बोलता येणार नाही, असे म्हणत राहुल यांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पुस्तकाची प्रतच संसदेत आणली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे पुस्तक उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पेंग्विन इंडियाला नोटीस

पोलिसांनी सध्या प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला नोटीस बजावली आहे. त्यांच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. गरज भासल्यास प्रकाशनाशी संबंधित इतर व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

छपाईच्या आधीची प्रत सार्वजनिक कशी झाली?

अधिकृतपणे प्रकाशित झालेले नसतानाही हे पुस्तक बाजारात आले कसे हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. प्रकाशनपूर्व प्रत कोणाकडे पोहोचली? यासाठी काही अंतर्गत कट रचण्यात आला होता का याचा तपास पोलीस करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.