
गटारगंगेत पाय बुडवा, मगच आत या अशी परिस्थिती चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याची झाली आहे. पोलीस ठाण्याच्या दारातच सांडपाणी तुंबल्याने कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागते. दररोज सकाळी पालिकेचे कर्मचारी कचरा उचलतात. मात्र इमारतीतील नागरिक पुन्हा पोलीस ठाण्याच्या आवारात कचरा टाकत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाण आणि दुर्गंधीच्या बजबजपुरीमुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चितळसर मानपाडा येथे पोलीस ठाणे असून या ठिकाणी ८० कर्मचारी काम करतात. सुमारे पाच लाख नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. पोलीस ठाण्याच्या दारातच गटारगंगा वाहत आहे.
पुनर्वसन झालेले नागरिक प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, कागदाच्या प्लेट पोलीस ठाण्याच्या आवारात टाकत असल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग पसरले आहे. पालिकेचे कर्मचारी दररोज कचरा उचलत असले तरी रहिवासी पुन्हा कचरा टाकत असल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
पालिकेकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. हे पोलीस ठाणे आहे की कचराकुंडी असा प्रश्न तक्रारी देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पडतो.
भंगार गाड्यांचा गराडा
गटार तुंबल्याची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी येऊन गटार दुरुस्तीचे काम करतात. मात्र दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांत गटाराचे सांडपाणी पुन्हा रस्त्यावर येते. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली थुकपट्टी लावली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या भंगार गाड्यांचा गराडा पडला आहे. यातील अनेक दुचाकी रस्त्यावर आडव्या पडल्या आहेत.
































































