Delhi Red Fort Blast- दिल्ली बॉम्बस्फोटात जैश-ए-मोहम्मदचा हात; UN च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या चौकशीत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या (UN) 37 व्या ताज्या अहवालात या हल्ल्यामागे ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारमधील स्फोटात 15 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या भीषण हल्ल्यानंतर जैशने या कृत्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता UN च्या अहवालातून याला दुजोरा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्य राष्ट्र सुरक्षा विभाग परिषदेत 1267 सेक्शन कमिटीसाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या अहवालात दिल्ली स्फोटासोबतच कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये 26 पर्यटकांनी जीव गमावला होता. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) ने घेतली होती.

हिंदुस्थानने असा दावा केला आहे की, जैश अजूनही कारवायांमध्ये सक्रिय आहे. या अहवालात जैशचा प्रमुख मसूद अजहर याच्या एका नवीन रणनीतीचाही पर्दाफाश झाला आहे. मसूद अजहरने 8 ऑक्टोबर रोजी ‘जमात-उल-मुमिनात’ नावाच्या एका विशेष महिला विंगची स्थापना केल्याचे अहवालात नमूद आहे. या विंगचा दहशतवादी कारवायांना गुप्तपणे मदत करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे. या माहितीमुळे जैश-ए-मोहम्मद आता पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

हिंदुस्थानने जैश आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटना आजही सीमापार सक्रिय असल्याचे पुरावे दिले आहेत. तर पाकिस्तानने या संघटना आता निष्क्रिय झाल्याचा दावा केला आहे. मात्र, UN अहवालाने पाकिस्तानचा हा दावा फोल ठरवत जैशच्या वाढत्या कारवायांवर चिंता व्यक्त केली आहे.