
मुंबईतील कोस्टल रोडवरील या म्युझिकल रोडची खरंच मुंबईकरांना गरज आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सरकारला विचारला. या म्युझिकल रोडसाठी गाणे वापरताना मराठी गाण्याची निवड का करण्यात आली नाही, असाही प्रश्न सरकारला केला.
विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत; पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल, तर तो विकास अपूर्ण आहे, अशी टीका त्यांनी या वेळी केली. नवीन प्रयोग जरूर करा, पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे, याचे भान राखणे गरजेचे आहे. मुंबईकरांना खरंच ‘याची’ गरज आहे का? रस्त्यांचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टाहास, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. तर वाजवायचंच होतं, तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणे का नाही? आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? ‘गर्जा महाराष्ट्र माझा’सारखं आपलं राज्यगीत किंवा स्वरसम्राज्ञी लता दीदींच्या अजरामर स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं, तर अतिउत्तम झाले असते, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते, अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले.





























































