अजितदादांच्या विमानाच्या पायलटवर कोणाचा दबाव होता का याची चौकशी व्हायला हवी? रोहित पवार यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद विमान अपघातात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानाचे फ्युएल कंट्रोल बटन पायलटने बंद केल्याचे समोर आले आहे. त्याचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

”अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये अहमदाबाद येथे विमान दुर्घटना घडली आणि 260 प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू असतानाच इटालियन दैनिकाने नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील सूत्रांच्या हवाल्याने खळबळजनक वृत्त प्रसिद्ध केले आहे. 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद होऊन झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे नव्हता. इंधन पुरवठा जाणीवपूर्वक खंडीत केला गेल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे. त्यानुसार अंतिम अहवाल तयार केला जात आहे. यासाठी अमेरिकन तज्ञही मदत करीत आहेत, असे ‘कोरीएर डेला सेरा’च्या वृत्तात म्हटले आहे. दोघा वैमानिकांपैकी एकाने इंधन नियंत्रण स्विच बंद केल्यानंतर विमानाची शक्ती गेली आणि ते जमिनीवर कोसळले, असा दावा सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.