
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात उघडकीस आलेल्या लाचप्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे.
‘इमान ३५ हजारात विकले जातेय’
अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करताना म्हटले की, ‘ज्या विभागावर जनतेच्या आरोग्याची मोठी जबाबदारी आहे, तिथेच केवळ ३५ हजार रुपयांसाठी ‘इमान’ विकले जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे’. मंत्रालयात फाईल क्लिअर करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मंत्र्यांचे कर्मचारी आणि ‘अप्पा शिंदे’ कनेक्शन
या प्रकरणात समोर आलेल्या नावांवरून दानवे यांनी संशय व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आरोपींचे संबंध मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांशी असणे आणि त्यात ‘अप्पा शिंदे’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होणे हा केवळ योगायोग असू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. ‘खालपासून वरपर्यंत सर्वांचे ‘टेबल’ (लाचेचे दर) ठरले आहेत का?’ असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एसीबीला आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून थांबू नये, असे आवाहन दानवे यांनी केले आहे. ‘एसीबीने केवळ फांद्या छाटू नयेत, तर या भ्रष्टाचाराच्या बुंध्यावर घाव घालावा’, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, दानवे यांनी ही पोस्ट पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना टॅग करून सरकारचे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे.
ambadas danve slams maharashtra govt over fda bribery case and ministry corruption
Keywords: ambadas danve x post, fda bribery case mumbai, corruption in maharashtra ministry, appa shinde fda case, acb maharashtra raid, shiv sena ubt news

























































