
मध्य प्रदेशातील महू-खंडवा मार्गावर गेज रूपांतरणाचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केंद्राकडून अंतिम मंजुरी मागितली आहे. या कामात १.२४ लाखांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, दोन्ही जिल्ह्यांतील घनदाट जंगलातील ब्रॉडगेज लाईनसाठी झाडे तोडता येणार आहेत. मुंबईत मेट्रो कारशेडसाठी भाजपने आरेतील झाडांची कत्तल केली. तसेच नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवनातील झाडांची कत्तल होत आहे. आता भाजप मध्ये प्रदेशातील झाडांवर कुऱ्हाड चालवणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, १५६ किमी लांबीची ब्रॉडगेज रेल्वेलाईन स्वातंत्र्यपूर्व काळात टाकलेल्या 118 किमी लांबीच्या नॅरोगेज ट्रॅकची जागा घेईल. गेज रूपांतरणाचे काम सुरू आहे आणि पुढील दोन वर्षांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुमारे ९० किमी लांबीच्या महू (डॉ. आंबेडकर नगर)-ओंकारेश्वर रोड सेक्शनवरील उर्वरित गेज रूपांतरणाच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी आवश्यक आहे.
महू-खंडवा गेज रूपांतरण प्रकल्पासाठी १.२४ लाख झाडे तोडण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने ४५४ हेक्टर वनजमिनीच्या वापरासाठी केंद्राकडून अंतिम मंजुरी मागितली आहे. ते म्हणाले, महू आणि मुख्तियारा-बलवाडा दरम्यान सुमारे ४५४ हेक्टर वनजमिनीवर बांधकाम होईल. जमीन खरेदी करण्यासाठी रेल्वेने आधीच वन विभागाकडे १००.०८ कोटी रुपये जमा केले आहेत आणि मंत्रालयाकडून तत्वतः मान्यता घेतली आहे.
वन विभागाच्या एका अधिकाऱ्याचा अंदाज आहे की इंदूर आणि शेजारच्या खरगोन जिल्ह्यांमध्ये उर्वरित बांधकामासाठी अंदाजे १.२४ लाख झाडे तोडावी लागतील. त्यांनी सांगितले की, झाडांची मो्या प्रमाणात कत्तल आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि मोठ्या संख्येने झाडे वाचवण्यासाठी विभागाने एक सविस्तर योजना तयार केली आहे. पर्यावरणीय नुकसान भरपाईसाठी प्रभावित क्षेत्राच्या दुप्पट आकाराच्या क्षेत्रात भरपाई म्हणून झाडे लावली जातील, असे सांगण्यात येत आहे.

























































