मुंबईतील नागरी प्रश्न सोडून बांगलादेशाचा मुद्दा का? आदित्य ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा हा केंद्र आणि राज्याच्या गृहमंत्रालयाचा विषय आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच महत्त्वाच्या नागरी प्रश्नांऐवजी महापौरांचा संपूर्ण भर आता बांगलादेशाच्या मुद्द्यावर असल्याचे दिसत आहे अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्ते खोदलेले आहेत, कचरा वेळेवर उचलला जात नाही, पादचारी मार्ग वापरण्यायोग्य नाहीत, मोकळ्या जागांवर बिल्डर अतिक्रमण करत आहेत, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढत आहे. अशा महत्त्वाच्या नागरी प्रश्नांऐवजी महापौरांचा संपूर्ण भर आता बांगलादेशाच्या मुद्द्यावर असल्याचे दिसत आहे.

बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा हा केंद्र आणि राज्याच्या गृहमंत्रालयाचा विषय आहे. त्यामुळे या संदर्भात भाजपने काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत.

जर हे खरे असेल, तर बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे कसे शिरले?
ते देशाच्या एका टोकापासून दक्षिण-पश्चिमेकडे, अनेक भाजपशासित राज्यांतून जात मुंबईपर्यंत कसे पोहोचले?
भाजपचे केंद्र सरकार दहा वर्षांहून अधिक काळ सत्तेत असताना ते इतका काळ येथे कसे राहिले?

या सर्व प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि प्रशासन यांचे अपयश स्पष्ट दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. या अपयशासाठी भाजपच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. जर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरी झाली असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारांनी ती रोखण्यात किंवा त्यांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्यात अपयश का लपवले, असा सवालही ठाकरे यांनी केला.

यावरून राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भाजपचे केंद्र सरकार अपयशी ठरल्याचेच सिद्ध होते, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.