टक्केवारी सरकार बसलेले आहे, लाचखोरी प्रकरणात भाजपचे षडयंत्र; यशोमती ठाकूर यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात असतानाच, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या संपूर्ण घटनेमागे भाजपचे षडयंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नरहरी झिरवळ यांना मुद्दाम बदनाम करण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचा दावा करतानाच त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सध्या मंत्रालयातील कोणत्याही विभागात किंवा कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयात गेले तरी तिथे ‘टक्केवारी’चा हिशेब उघडपणे सुरू आहे. संपूर्ण सरकारच टक्केवारीच्या चिखलात रुतलेले असताना त्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये. राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात भ्रष्टाचाराचे हे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असून हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट असल्याची टीका त्यांनी केली. टक्केवारीचे सरकार तिथे बसलेले आहे. हे मी असेच म्हणेन. त्यांनी जो प्रस्ताव टाकलेला आहे त्याला काही वास्तव नाही. निशिकांत दुबे यांच्यासारख्या व्यक्तींचे प्रस्ताव जर मंजूर होत असतील, तर देशात पूर्णपणे हुकूमशाही आल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा निषेध करताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप राहुल गांधींना का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मागच्या निवडणुकीपासून राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करणे किंवा त्यांचे घर काढून घेणे अशा खालच्या पातळीवरच्या कृती सातत्याने केल्या जात आहेत. राहुल गांधी आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या, लहान व्यापाऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना सरकारकडे त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हिंमत नाही. 18 टक्के टॅरिफच्या माध्यमातून सामान्य जनतेचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणारे पंतप्रधान साधी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. महिलांच्या आड लपून खालच्या दर्जाचे राजकारण केले जात आहे. एपस्टीन फाईलमध्ये हरदीप सिंग पुरी यांचे नाव आल्यावर त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? असा प्रश्न विचारत त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात आणल्या जाणाऱ्या मोशनचा तीव्र शब्दांत निषेध केला. देशाचे राजकारण अत्यंत चुकीच्या वळणावर नेण्याचे काम सध्या सुरू असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.