
>> पराग पोतदार
कोलकात्यातील रामराजतल येथील नारळ विकणारे लक्ष्मी दा, त्यांच्या नि:स्वार्थी कार्याची ओळख म्हणजे अनेकांना जीवनदान देणे. रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या अनेकांचा अपघातापासून बचाव करत गेली 35 वर्षे लक्ष्मी दा ही सेवा अखंडपणे देत आहेत. समाजासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून एवढे मोठे कार्य करणारे लक्ष्मी दा अनेकांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.
काही माणसांच्या आयुष्यातील एखादी घटना माणसांचे जीवन जगण्याची पद्धत आणि त्यांची विचार करण्याची दिशाच बदलून टाकते. बंगालच्या लक्ष्मी दा यांच्याही बाबतीत असेच काहीसे घडले, ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्याचा परिणाम आज लक्ष्मी दा कोलकात्यातील रामराजतल येथील हावडा ब्रिजच्या खाली रेल्वे पटरी ओलांडणाऱ्या प्रवाशांचे जीव वाचवत आहेत. नारळ विकणारे लक्ष्मी दा गेली 35 वर्षे ही सेवा अखंडपणे देत आहेत.
1991 साली एके दिवशी नारळ विकत असताना त्यांनी रेल्वे पटरी ओलांडणारे 21 प्रवासी लोकल रेल्वेखाली आल्याचे पाहिले. त्यात त्या प्रवाशांचा जीव नाहक जीव गेला. त्यांच्या किंकाळ्यानी आणि तेथील प्रत्यक्ष पाहिलेल्या दृश्यांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्या दिवसापासून त्यांनी ठरवले की, माझ्या भागात मी असेपर्यंत पटरी ओलांडणाऱ्या एकाही रेल्वे प्रवाशाचा जीव जाणार नाही आणि तिथूनच त्यांच्या या सेवेला सुरुवात झाली
स्टेशनला ओवर ब्रिज असला तरी प्रवासी घाईतच पटरीवरून रस्ता पार करताना दिसतात. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे सगळं थांबविण्यासाठी ते आपला दिनक्रम सकाळी पाच वाजता सुरू करतात. ते सकाळी नारळ विकायला तिथे जातात आणि रेल्वेची वेळ झाली की हातात काठी घेऊन ते आपल्या कार्याची सुरुवात करतात. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ते सुरक्षितपणे पटरी पार करून देतात. त्यांना प्रत्येक रेल्वेची तेथून जाण्याची वेळ लक्षात असते, यानुसार ते आपल्या कार्याचे नियोजन करतात.
नारळ वेचणाऱ्या या सभ्य गृहस्थाला या कामासाठी ना पगार मिळतो ना आजवर कुठला पुरस्कार प्राप्त झाला आहे, पण त्यांची ही सेवा अखंडपणे सुरू आहे. लक्ष्मी दा यांच्यासारखी नि:स्वार्थी काम करणारी मंडळी आपल्याला जगण्याचे बळ तर देतेच, पण स्वतचे काम चोख बजावण्यासाठी आयुष्यात नवी ऊर्जादेखील प्राप्त करून देते.


























































