Video – अलिबागच्या म्हात्रोळी गावात जमिनीच्या मोजणीवरून राडा; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना गावकऱ्यांनी पिटाळून लावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात जमिनीच्या मोजणीवरून मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या भागात जमीन खरेदी केली असून, त्या जमिनीच्या मोजणीसाठी ते गेले असता स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. यावेळी संतप्त महिलेने नार्वेकरांसोबत आलेल्या व्यक्तीला चोप दिल्याचेही समोर आले आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राहुल नार्वेकर यांनी म्हात्रोळी येथे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रशासन आणि नार्वेकर यांचे पथक गावात पोहोचले होते. मात्र, नियमानुसार जमिनीची मोजणी करताना शेजारील जमीन मालकांना अधिकृत नोटीस देणे बंधनकारक असते. स्थानिक ग्रामस्थांचा असा आरोप आहे की, कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता ही मोजणी सुरू करण्यात आली.

मोजणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करत स्थानिक गरीब शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोजणी थांबवली. यावेळी झालेल्या वादात परिस्थिती हाताबाहेर गेली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वादावादी दरम्यान, नार्वेकर यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीच्या महिलेने कानशिलात लगावल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. तसेच यावेळी नार्वेकर यांच्याशीही स्थानिकांची शा‍ब्दिक बाचाबाची झाली.

आम्ही घरात नाही ही संधी साधून आत घुसल्याचा आरोप महिला आणि तिच्यासोबतचा व्यक्ती करताना व्हिडीओत दिसत आहेत. तसेच आमची जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी राहुल नार्वेकर भांडण करू नका, सरकारी काम आहे, असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र स्थानिकांनी त्यांनाही रोखत चूक तुमची असल्याचे म्हटले. आम्ही असताना मोजणी केली असती तर चालले असते, असे म्हणताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तिथून पळ काढला.