
हिंदुस्थान-अमेरिका मुक्त व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा हल्ला केला. सरकारने कापूस उत्पादक व टेक्सटाइल उद्योजकांचा विश्वासघात केला आहे. हा करार अटी-शर्तींवर झाला आहे हे सरकारने देशापासून का लपवले, असा सवाल राहुल यांनी केला.
पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हिंदुस्थान-अमेरिका कराराच्या मुद्दय़ावर संभ्रम पसरवत आहेत. बांगलादेशच्या कापड निर्यातीवर अमेरिकेने शून्य टक्के टॅरिफ लावले आहे. हिंदुस्थानला मात्र 18 टक्के टॅरिफ द्यावे लागणार आहे हे त्यांनी निदर्शनास आणले होते. त्यावर, आपल्यालाही कापड निर्यातीवर शून्य टक्के टॅरिफ हवे असेल तर अमेरिकेतून कापूस आयात करावा लागेल, असे पीयूष गोयल म्हणाले होते. त्यावरूनच राहुल यांनी सरकारला धारेवर धरले.































































