
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील युरोपियन संघांविरुद्धची पराभवाची मालिका अखेर इंग्लंडने शनिवारी खंडित केली. टॉम बॅण्टनच्या झुंजार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने स्कॉटलंडवर पाच विकेट राखून विजय मिळवीत ‘युरोपियन शापा’तून अखेर मुक्तता केली. कारण यापूर्वी टी-20 वर्ल्ड कपमध्ये युरोपीय संघांविरुद्ध इंग्लंडने लागोपाठ पाच सामने गमावले होते.
स्कॉटलंडकडून मिळालेले 153 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडला 19 व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली. अखेर 18.2 षटकांत 5 बाद 155 धावा करीत इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब केले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात डळमळीत झाली. त्यांची अवघ्या दोन षटकांत 2 बाद 13 अशी दुर्दशा झाला अन् पुन्हा एकदा इतिहासाची सावली जाणवू लागली.
बॅण्टन–बेथेल जोडीने सावरले
मात्र जेकब बेथेलने ब्रॅण्डन मॅक्युलमच्या षटकात षटकार आणि चौकारांची आतषबाजी करीत डावाला वेग दिला. त्यानंतर बॅण्टनने डावखुऱ्या फिरकीपटू मार्क वॉटवर तीन षटकार ठोकत स्कॉटलंडला हादरा दिला. बॅण्टन आणि बेथेल यांच्यातील 66 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. बेथेल 32 धावांवर बाद झाल्यानंतरही बॅण्टनने संयम राखला.
सॅम कुरन आणि विल जॅक्स यांच्यासह महत्त्वाच्या भागीदाऱ्या करीत त्याने इंग्लंडला विजयाच्या उंबरठय़ावर नेले. 44 चेंडूंत 63 धावांची नाबाद खेळी करीत बॅण्टनने इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचविले. स्कॉटलंडकडून ब्रॅण्डन मॅक्युलम, ब्रॅड व्हील, मायकेल लिक्स व ऑलिव्हर डेव्हिडसन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
स्कॉटलंड दीडशेपार!
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने इंग्लंडच्या प्रभावी गोलंदाजीचा प्रतिकार करीत 19.4 षटकांत 152 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. रिची बेरिंग्टन (49) आणि टॉम ब्रूस (24) यांच्या भागीदारीने संघ सावरला. आदिल राशीदने मधल्या षटकांत तीन विकेट घेत स्कॉटलंडचा डाव खिळखिळा केला, तर जोफ्रा आर्चरने सुरुवातीला दुहेरी धक्का दिल्याने इंग्लिश गोलंदाजांना स्कॉटलंडच्या फलंदाजांना रोखता आले. एका टप्प्यावर स्कॉटलंड तीन बाद 105 अशा मजबूत स्थितीत वाटत होते. मात्र लागोपाठ फलंदाज बाद होत गेल्याने त्यांची 16 षटकांत आठ बाद 127 अशी केविलवाणी स्थिती झाली. ऑलिव्हर डेव्हिडसनने नाबाद 20 धावांची खेळी करीत आपल्या संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.


























































