
कांदळवनाची बेसुमार कत्तल करून उभारलेल्या झोपड्या तोडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनी अक्षरशः मुजोरी केली. या पथकातील कर्मचाऱ्यांवर गुंडागर्दी करत तिवारी यांनी अश्लील शिवीगाळही केली. मात्र कारवाईत अडथळा आणूनही तिवारी यांच्यावर महापालिकेने कोणतीही कारवाई न केल्याने महापौर डिंपल मेहता त्यांच्या नगरसेवकांना वाचवत आहेत काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
भाईंदर पश्चिमेला जय अंबेनगर आहे. तेथील वनखात्याच्या जमिनीवरील कांदळवनाची बेसुमार कत्तल करून तेथे भूमाफियांनी चाळी उभारल्या आहेत. तेथे झोपड्या बांधून त्या २० ते २५ लाखांना विकल्या जातात. त्यांना नळ कनेक्शन, वीज कनेक्शन तसेच अन्य सुविधाही पुरवल्या जातात. महापौर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारताच शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोहीम तीव्र करण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यांचेच नगरसेवक खुलेआम अधिकाऱ्यांवर मुजोरी करत असल्याने मीरा-भाईंदरकरांनी संताप व्यक्त केला आहे.
महापौरांचा हाच झीरो टॉलरन्स का?
अशोक तिवारी महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष असताना लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले होते, गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तिवारी यांना तडीपार करण्याची कारवाईही पोलिसांनी प्रस्तावित केली होती. याच तिवारींनी महापालिकेच्या कारवाईत अडथळे आणून अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना मोकाट का सोडले, असा सवाल करत मनसेने तिवारी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे.

























































