अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांशी विश्वासघात, राहुल गांधींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेसोबत होणाऱ्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या करारामुळे हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांशी विश्वासघात होत असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी म्हणाले की, “अमेरिका व्यापार कराराच्या नावाखाली हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांच्या हिताला तडा जाताना दिसत आहे,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांना काही थेट प्रश्न विचारले.

त्यांनी पहिला प्रश्न विचारताना म्हटले की, डीडीजी (DDG) आयात करण्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा होतो का की हिंदुस्थानातील जनावरांना अमेरिकन जीएम मक्यापासून तयार केलेले डिस्टिलर्स ग्रेन खाऊ घालावे लागतील? त्यामुळे देशातील दुग्धउत्पादने अमेरिकन कृषी उद्योगावर अवलंबून राहणार नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुसऱ्या प्रश्नात त्यांनी जीएम सोयाबीन तेल आयातीचा मुद्दा उपस्थित केला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि देशभरातील सोयाबीन शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल, असा प्रश्न त्यांनी विचारला. आधीच किमतींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक धक्का कसा सहन करता येईल, असे ते म्हणाले.

तिसऱ्या मुद्द्यावर बोलताना “अॅडिशनल प्रॉडक्ट्स” या संज्ञेत नेमके कोणते उत्पादने येतात, याबाबत स्पष्टता मागितली. याचा अर्थ भविष्यात डाळी आणि इतर पिकांसाठीही अमेरिकन आयातीचा दबाव येणार का, असा सवाल त्यांनी केला.

चौथ्या प्रश्नात “नॉन-ट्रेड बॅरियर्स” हटवण्याचा नेमका अर्थ काय, असे विचारत त्यांनी चिंता व्यक्त केली. भविष्यात जीएम पिकांबाबत हिंदुस्थानचा दृष्टिकोन सैल करण्यासाठी, सरकारी खरेदी व्यवस्था कमकुवत करण्यासाठी किंवा एमएसपी आणि बोनस कमी करण्यासाठी दबाव आणला जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पाचव्या मुद्द्यात त्यांनी विचारले की, एकदा हा दरवाजा उघडला तर दरवर्षी तो अधिक खुला होण्यापासून कसा रोखता येईल? यासाठी काही ठोस संरक्षणात्मक व्यवस्था असेल का, की प्रत्येक करारात हळूहळू आणखी पिकांचा समावेश केला जाईल?

“शेतकऱ्यांना या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळालीच पाहिजेत. हा फक्त आजचा प्रश्न नाही, तर भविष्यात हिंदुस्थानच्या कृषी क्षेत्रावर दुसऱ्या देशाची दीर्घकालीन पकड निर्माण होणार का, हा मोठा प्रश्न आहे,” असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.